Tuesday, May 14, 2024

त्रिवेणी संगम - केदारेश्वर

राजपिपला जाण्यासाठी प्रवास करत असताना ‌महाराष्ट्रतल्या नंदूरबार जिल्ह्यात प्रकाशा हे गाव लागतं.ह्याला प्रति काशी असंही म्हटलं जातं. तिथल्या सद् गुरू धर्मशाळेत अनेक परिक्रमावासी विश्रांती घेतात. त्यांच्या जेवण्याखाण्याची, रहाण्याची व्यवस्था देखील तिथं होते. आम्ही अनेकांनी त्यांच्या कार्याला आर्थिक मदत केली. तिथल्या केदारेश्वर मंदिरासमोर एक पांढर्‍या रंगाचा मनोरा होता.ज्यात चढण्यासाठी पायऱ्या होत्या पण एका वेळी एकच जण चढू शकेल अशी आत मध्ये रचना होती. आम्ही ६-६ जणांचा ग्रुप करून चढून वर गेलो कारण वर गेल्यावर समोर तीन नद्यांचा संगम दिसत होता. तापी, गोमती व केदारगंगा ह्या‌ तीन नद्यांचा संगम इथं झाला आहे आणि फुलंदा नदी अदृश्यपणे त्यांना येऊन मिळते असं गुगल सर्च वर मी वाचलं.पण वरती चढल्यावर येणारी थंड हवा समोरचं तापी नदीचं विस्तीर्ण पात्र मन प्रसन्न करत होतं. परिक्रमेतलं एक सुंदर ठिकाण म्हणून कायम लक्षात राह्यलं.                              
     २) छोटी पनवती, मोठी पनवती मंदिर आणि शनी मंदिर.                                                               पनवती शब्द साधारणपणे होणारा त्रास किंवा त्रासदायक व्यक्तींसाठी आपण वापरत असतो. पण त्या पनवतीचं मंदिर असणं किती वेगळं वाटतं ना पण परिक्रमेत ह्या दोन्ही मंदिरात आपल्याला पनवती देवता देवीच्या स्वरूपात दर्शन देतात.खाली छोटी पनवती जिना चढून गेल्यावर मोठी पनवती आणि शनी मंदिर आहे. शनी महाराजांनी इथं तपस्या केली असं सांगितलं गेलं. समोर कालभैरवांच देऊळ आहे.त्या परिसरातल्या देवळात प्रत्येकजण आपल्या त्रासांपासून मुक्ती मागत असेल असं मनात येतं.
१८ दिवसाच्या नर्मदा परिक्रमेत जे काही भावल, जाणवलं ते मी गेले पाच महिने श्रध्देनं लिहीलं. ज्यांनी वाचलं त्यांनी कौतुक केलं.त्यामुळे लिहताना आनंदही झाला. म्हणूनच ह्या समेवर मी थांबतेय. पुढच्या महिन्यात ह्या निमित्ताने वाचलेल्या नर्मदेवरच्या कथा लिहीणार आहे. परिक्रमेवरचं लेखन इथं थांबवतेय.
      ह्या प्रवासात बरोबर असलेल्या मंडळींचा परिचय माझ्या जवळ असावा म्हणून गेले काही दिवस तेही लिहीतेय. 
आमच्या बरोबर तीन बहिणी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ असा छानसा चौकडा होता. सर्वात मोठी बहीण म्हणजे प्रतिमा चंद्रकांत शेवाळे आणि प्रवासातल्या सर्वांच्या ताई... ताडदेवला रहाणार्‍या ताईं गृहिणी आहेत. पण ह्या प्रवासात त्यांचं आपल्या भावंडाकडे आणि त्या तिघांच आपल्या ताईकडे विशेष लक्ष असायचं. दुसरी बहिण आरती सावंत आता जरी गृहिणी असल्या तरी पूर्वी रशियन counsulate मध्ये कामाला होत्या. दहिसरला रहाणार्‍या आरती ताई खूप उत्साही असायच्या.तिघी बहिणींचा दादा‌ प्रवीण तावडे रहाणार डोंबिवली.‌ ते सारस्वत बॅकेतून निवृत्त झाले आहेत.त्यांची मुलगी डॉक्टर आहे आणि सर्वात धाकटी बहीण म्हणजे पूर्वा वारंग. जी सध्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात स्टोअर अधिकारी म्हणून कार्यरत आहे .ती चेंबूरला रहाते. आमच्या संध्याकाळच्या भजन,गरबा ह्यात आवडीने भाग घेणारी म्हणजे पूर्वा असायची.दादांनी त्या चौघांबद्दल खूप छान लिहून पाठवलं" लहानपणी वडिलांच्या मृत्यूनंतर एकेमेकांचे हात धरून जसे उभे राह्यलो तसेच आजपर्यंत आहोत.. किती यथार्थ लिहीलंय ना!!
       त्यानंतर वीणाताई बारसकर ज्या डोंबिवलीत रहातात. त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत. शिक्षणानी एम्.ए.असलेल्या वीणाताई कविता करतात. त्यांच्या अनेक कविता दिवाळी अंकातून प्रसिद्ध ही झाल्या आहेत.त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांची मैत्रीण स्वाती गिरकर जिच्यामुळे माझी परिक्रमा झाली असं आवर्जून वीणाताईंनी सांगितल.त्या स्वातीताई बॅंक आॅफ महाराष्ट्र मधून निवृत्त झाल्या आहेत.पूर्वी त्या डोंबिवलीतच रहायच्या सध्या भांडूपला रहातात. स्वातीताईंचा विशेष म्हणजे त्या मदत करायला नेहमीच पूढे रहातात. 
 अशा अनेक मित्र -मैत्रिणींबरोबर आलेल्या मंडळीत परिक्रमेत एक रूममध्ये राह्यल्या मुळे मित्र झालेले मल्हार कुलकर्णी आणि रमेश लोखंडे!! त्यातही मल्हारजी सर्वात ज्येष्ठ तरीही प्रत्येक ठिकाणी उत्साहात वावरणारे म्हणून आमच्यासाठी आदर्श होते.शिक्षणानी एम्.एस् सी.एम.फिल. असलेल्या मल्हारजी सावंतवाडीच्या डिग्री काॅलेजमध्ये गणित विषय शिकवत होते. आणि त्या महाविद्यालयात गणित विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाह्यलंय. त्या महाविद्यालयात व्हाॅईस प्रिन्सिपॉल म्हणूनही ते अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांचे महत्त्वाचे छंद म्हणजे प्रवास,ब्रिज खेळणे, पोहणे आणि वाचन.सध्या ते बावधनला अथश्री मध्ये रहातात. 
       त्यांचे परिक्रमेत झालेले मित्र रमेश लोखंडे हे शिक्षणांनी एम्.ए. बी.एड्. आणि मला वाटतं की दोघांची मैत्री होण्यासाठी शिक्षक हे आदर्श कार्य असणारी दोघांची नोकरी!! रमेशजी भांडूपच्या जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयातून निवृत्त झाले आहेत.आणि निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य जळगांवला आहे.त्यांनाही वाचन आणि प्रवासाची आवड आहे.
आमच्या बरोबर बसमध्ये असलेल्या शुभांगी देसाई ह्यांना गप्पा, गाणी ह्याची खूप आवड होती.
     आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे गीतांजली गंधे जी माझ्या फक्त एका फोनवर माझ्या बरोबर परिक्रमेला यायला तयार झाली. तिची माझी मैत्री जवळजवळ ३८ वर्षांची... ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम केलं.. भेटत राह्यलो!! तिचा शांत स्वभाव, काम करण्यातलं सातत्य यामुळे गेली कित्येक वर्ष ती दिलासा ह्या डोंबिवलीतल्या वृध्दाश्रमाचं काम पहातेय!! आणि परिक्रमेत मला सांभाळून घेतलं.
महत्वाचं म्हणजे दोस्ती टूरची संपूर्ण टीम ज्यांचा उत्तम व्यवस्थेसाठी इथं खास उल्लेख करायला हवा. त्यांच्यामुळे जेवण-खाणं, सामानाची ने-आण, प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थित रीतीने पार पडत होती. अर्थात ह्या सगळ्याच उत्तम आयोजन दोस्तीच्या प्रवीण ह्यांनी केलेलं होतं.अगदी पुजेसाठी गुरूजी, पुजा करायला घाटावरच्या नीटनेटक्या जागा, दर्शनासाठी नीट व्यवस्था हे सगळं प्रवीणनी त्याच्या समजूतदार स्वभावानी उल्लेखनीय रीतीने आम्हाला सांभाळून घेत केलं.
सर्वांचेच मनापासून आभार 🌿।। नमामि देवी नर्मदे।।
                                       ललिता छेडा 

Tuesday, April 30, 2024

गरूडेश्र्वर ‌

      खरं म्हणजे परिक्रमा ही एक अनुभूती आहे.जी शब्दात लिहीणं खूप कठिण आहे.तरीसुध्दा मला जे आठवतंय,वाटतंय ते ‌लिहीण्याचा मी प्रयत्न करतेय. आणि माझ्या बरोबर आलेली मंडळी, माझ्या मैत्रिणी, काही वाचक त्या लिहीण्याच कौतुक करत आहेत त्यामुळे लिहायला स्फूर्ती मिळतेय.
       रोज नवं गावं नवे मुक्कामाचे ठिकाण हे वेगवेगळे अनुभव देणारं असायचं पण त्यात सुध्दा पहाटे घाटावर पूजा केली की आजूबाजूची नवीन तरीही महत्वाची देवळं म्हणजे आनंदनिधान असायचं!! कितीतरी ठिकाणी गुरुंकडून, पुजार्‍यांकडून,गाईड कडून त्या मंदिराविषयी आख्यायिका, कहाण्या ऐकायला मिळायच्या.
     बोटीच्या प्रवासानंतर मिठीतलाई पोचलो आणि तिथून मुक्कामाला गरूडेश्र्वरला पोचलो. गरुडेश्र्वराला दत्तमंदिर आहे.या मंदिरात त्रिमूर्ती दत्ताची संगमरवरी मूर्ती आहे गाभाऱ्यात दत्त मुर्ती शेजारी उजव्या हाताला शंकराचार्यांची तर डाव्या हाताला सरस्वतीची बैठी मूर्ती आहे. गाभाऱ्याबाहेर मध्यभागी वासुदेवानंद सरस्वतींची बैठक घातलेली मूर्ती आहे. आणि त्या मुर्ती पूढे त्यांच्या पादूका आहेत. मैयेला जाताना थोड्या पायऱ्या उतरल्यावर प.पू.वासूदेवानंद सरस्वती ह्यांची समाधी आहे.परिक्रमेतलं एक काहीतरी अनुभुती देणारं हे मंदिर आहे. 
शेठाणी घाट 
         संपूर्ण परिक्रमेतला मोठा आणि रेखीव घाट!! पूर्वी नर्मदापूर नांव असलेल्या हौशिंगाबादला हा घाट आहे.संध्याकाळी हौशिंगाबादला पोचल्यावर आम्ही सर्वजण घाटावर गेलो संध्याकाळच्या वेळी बर्‍याच जणांनी नर्मदेत दिवे सोडले होते. त्या मोठ्या घाटावर त्या दिव्यांनी घाटाचं सौंदर्य वाढत होते. घाटाजवळ जगन्नाथाचं मंदिर आहे तिथंच सत्संगभुवन आहे.ज्याचा अनेक भाविक, परिक्रमावासी अनुभव घेतात. घाटाजवळ श्री हनुमान, नर्मदामाता, भगवान शंकर श्री शनिदेव अशी अनेक देखणी मंदिरे आहेत.
    कोणत्याही घाटावर उभ राह्यलं  की मनात यायचं "नमामि देवी नर्मदे"
   आता आपल्या बरोबर असलेल्या सहप्रवाशांची थोडक्यात ओळख... ह्यावेळी जोडीनं आलेल्या मंडळींचा परिचय देणार आहे.
      ज्योती दोंदे आणि दिलीप दोंदे रहायला ठाण्याला पण सध्या लेकी कडे ओमानला गेले आहेत.
      दिलीपकाका ग्लैक्सो आणि एससीआय मध्ये रिसर्च आणि international marketing विभागाध्यक्ष होते. मॅनेजमेंट institution मध्ये visiting faculty होते.सध्या इंटरनॅशनल विक्री सल्लागार आहेत.मंडळी बघा आपल्या बरोबर किती मोठी‌ व्यक्ती होती. आणि खरं सांगायचं तर मला वाटतं त्यांनी परिक्रमा काकूंसाठी केली अनेक ठिकाणी ते चढू उतरू शकत नसल्याने ते वरती बसून रहायचे‌ सहजीवनाचे सुंदर उदाहरण!! आणि काकू सुध्दा आर्.बी.आय एक्सेंज कंट्रोल तसेच इतर विभागात काम करून निवृत्त झाल्या आहेत. काकूंची आवड म्हणजे गाणी ऐकणं!!
    आपलं दुसरं दांपत्य म्हणजे प्रशांत श्रोत्री आणि विदूला श्रोत्री!! दोघही दिसायला इतके तरूण की आम्हा सर्वांच्या मनात आलं की घर, मुलं सोडून ही दोघं कसे आले असतील? पण प्रशांत स्टॉक होल्डिंग्स काॅरपरेशन मधून निवृत्त आणि विदूला रेल्वेतून निवृत्त!! आहे की नाही गंमत! प्रशांतला जुनी गाणी ऐकायला, वाचायला आणि प्रवास करायला आवडतं. विदूला यू ट्यूब वरच्या रेसिपी बघून मस्त नवनवीन प्रयोग करून खायला घालते असं प्रशांत नी खास लिहलंय!! त्यांच्या एका मुलीचं लग्न झालं आहे आणि दुसरी फिजिओथेरपी पदवी शिक्षण घेतेय. ह्या दोघांची स्पेशालिटी म्हणजे त्यांचा नंबर असायचा पण तो शेवटचा ह्याला उशीरा येणं असं मी नाही म्हणणार. मला वाटतं ह्या विनोदाचा त्यांना राग नाही येणार.
       आपली चौथी जोडी दोघीजणींची आहे. दोघी BSNL मधून रिटायर्ड झाल्या आहेत. आणि मैत्रीणी आहेत त्यामुळे सतत एकत्र होत्या.... पहिले आहेत जया गणाचारी आणि रमाकांत गणाचारी! रमाकांत MTNL मधून निवृत्त झाले आहेत.त्यांच्या मुलाचा स्वतःचा व्यवसाय आहे. हे रहातात सी वुड नवी मुंबईला!! ह्यांना पर्यटनाची आवड आहे आणि त्याच मुख्य कारण माणसं भेटणं त्यांच्याशी मैत्री होणं असं जयाताईंनी खास सांगितलं. मला जेव्हा जेव्हा चढा उतरायला गरज असायची तेव्हा जयाताईंचा हात नेहमी पूढे असायचा.
   दुसऱ्या म्हणजे सुमेधा दिक्षित आणि सुधीर दिक्षित. ते नव्या पनवेलला रहातात.सुधीरजी BOSCH मधून निवृत्त झाले आहेत आणि सध्या MNC येथे consultant म्हणून काम करत आहेत. सुमेधाताईंनी आवर्जून आपल्या गृपचा मांडवगडचा फोटो पाठवलाय. जो मी ब्लॉगवर‌ टाकलाय. फोटो बघून सर्वांच्या आठवणी जाग्या होतील.
 आणि आता शेवटची जोडी म्हणजे रमेश दळवी आणि रेणूका दळवी. ते‌नवी मुंबई नेरूळला रहातात. दोघंही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर असले तरी दोघांचं एकमेकांकडे सतत लक्ष असायचं. रमेशजी रक्षा लेखा विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांना जूनी गाणी ऐकायला खूप आवडतं. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे दुसर्‍यांना मदत करायला आवडतं... असं वाटणं किती महत्त्वाचं आहे!! त्यांनी रेणूका स्वैपाक खूप छान करते असं खास लिहीलय.नवर्‍यानी असं कौतुक केलं की छान वाटतं ना मंडळी!! सध्या ती दोघं ‌पोर्ट ब्लेअरला फिरायला गेली आहेत.
तर असे आपले सहप्रवासी त्यातसुद्धा वर्षा-अनिल दळवी, लीना-इन्द्रजीत डहाळे,शैला- गणेश शिंदे, श्री व सौ पानसरे ह्यांचा उल्लेख सुरवातीलाच केला आहे.
     सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
                           ललिता छेडा
    

     

       


त्रिवेणी संगम - केदारेश्वर

राजपिपला जाण्यासाठी प्रवास करत असताना ‌महाराष्ट्रतल्या नंदूरबार जिल्ह्यात प्रकाशा हे गाव लागतं.ह्याला प्रति काशी असंही म्हटलं जा...