२) छोटी पनवती, मोठी पनवती मंदिर आणि शनी मंदिर. पनवती शब्द साधारणपणे होणारा त्रास किंवा त्रासदायक व्यक्तींसाठी आपण वापरत असतो. पण त्या पनवतीचं मंदिर असणं किती वेगळं वाटतं ना पण परिक्रमेत ह्या दोन्ही मंदिरात आपल्याला पनवती देवता देवीच्या स्वरूपात दर्शन देतात.खाली छोटी पनवती जिना चढून गेल्यावर मोठी पनवती आणि शनी मंदिर आहे. शनी महाराजांनी इथं तपस्या केली असं सांगितलं गेलं. समोर कालभैरवांच देऊळ आहे.त्या परिसरातल्या देवळात प्रत्येकजण आपल्या त्रासांपासून मुक्ती मागत असेल असं मनात येतं.
१८ दिवसाच्या नर्मदा परिक्रमेत जे काही भावल, जाणवलं ते मी गेले पाच महिने श्रध्देनं लिहीलं. ज्यांनी वाचलं त्यांनी कौतुक केलं.त्यामुळे लिहताना आनंदही झाला. म्हणूनच ह्या समेवर मी थांबतेय. पुढच्या महिन्यात ह्या निमित्ताने वाचलेल्या नर्मदेवरच्या कथा लिहीणार आहे. परिक्रमेवरचं लेखन इथं थांबवतेय.
ह्या प्रवासात बरोबर असलेल्या मंडळींचा परिचय माझ्या जवळ असावा म्हणून गेले काही दिवस तेही लिहीतेय.
आमच्या बरोबर तीन बहिणी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ असा छानसा चौकडा होता. सर्वात मोठी बहीण म्हणजे प्रतिमा चंद्रकांत शेवाळे आणि प्रवासातल्या सर्वांच्या ताई... ताडदेवला रहाणार्या ताईं गृहिणी आहेत. पण ह्या प्रवासात त्यांचं आपल्या भावंडाकडे आणि त्या तिघांच आपल्या ताईकडे विशेष लक्ष असायचं. दुसरी बहिण आरती सावंत आता जरी गृहिणी असल्या तरी पूर्वी रशियन counsulate मध्ये कामाला होत्या. दहिसरला रहाणार्या आरती ताई खूप उत्साही असायच्या.तिघी बहिणींचा दादा प्रवीण तावडे रहाणार डोंबिवली. ते सारस्वत बॅकेतून निवृत्त झाले आहेत.त्यांची मुलगी डॉक्टर आहे आणि सर्वात धाकटी बहीण म्हणजे पूर्वा वारंग. जी सध्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात स्टोअर अधिकारी म्हणून कार्यरत आहे .ती चेंबूरला रहाते. आमच्या संध्याकाळच्या भजन,गरबा ह्यात आवडीने भाग घेणारी म्हणजे पूर्वा असायची.दादांनी त्या चौघांबद्दल खूप छान लिहून पाठवलं" लहानपणी वडिलांच्या मृत्यूनंतर एकेमेकांचे हात धरून जसे उभे राह्यलो तसेच आजपर्यंत आहोत.. किती यथार्थ लिहीलंय ना!!
त्यानंतर वीणाताई बारसकर ज्या डोंबिवलीत रहातात. त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत. शिक्षणानी एम्.ए.असलेल्या वीणाताई कविता करतात. त्यांच्या अनेक कविता दिवाळी अंकातून प्रसिद्ध ही झाल्या आहेत.त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांची मैत्रीण स्वाती गिरकर जिच्यामुळे माझी परिक्रमा झाली असं आवर्जून वीणाताईंनी सांगितल.त्या स्वातीताई बॅंक आॅफ महाराष्ट्र मधून निवृत्त झाल्या आहेत.पूर्वी त्या डोंबिवलीतच रहायच्या सध्या भांडूपला रहातात. स्वातीताईंचा विशेष म्हणजे त्या मदत करायला नेहमीच पूढे रहातात.
अशा अनेक मित्र -मैत्रिणींबरोबर आलेल्या मंडळीत परिक्रमेत एक रूममध्ये राह्यल्या मुळे मित्र झालेले मल्हार कुलकर्णी आणि रमेश लोखंडे!! त्यातही मल्हारजी सर्वात ज्येष्ठ तरीही प्रत्येक ठिकाणी उत्साहात वावरणारे म्हणून आमच्यासाठी आदर्श होते.शिक्षणानी एम्.एस् सी.एम.फिल. असलेल्या मल्हारजी सावंतवाडीच्या डिग्री काॅलेजमध्ये गणित विषय शिकवत होते. आणि त्या महाविद्यालयात गणित विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाह्यलंय. त्या महाविद्यालयात व्हाॅईस प्रिन्सिपॉल म्हणूनही ते अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांचे महत्त्वाचे छंद म्हणजे प्रवास,ब्रिज खेळणे, पोहणे आणि वाचन.सध्या ते बावधनला अथश्री मध्ये रहातात.
त्यांचे परिक्रमेत झालेले मित्र रमेश लोखंडे हे शिक्षणांनी एम्.ए. बी.एड्. आणि मला वाटतं की दोघांची मैत्री होण्यासाठी शिक्षक हे आदर्श कार्य असणारी दोघांची नोकरी!! रमेशजी भांडूपच्या जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयातून निवृत्त झाले आहेत.आणि निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य जळगांवला आहे.त्यांनाही वाचन आणि प्रवासाची आवड आहे.
आमच्या बरोबर बसमध्ये असलेल्या शुभांगी देसाई ह्यांना गप्पा, गाणी ह्याची खूप आवड होती.
आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे गीतांजली गंधे जी माझ्या फक्त एका फोनवर माझ्या बरोबर परिक्रमेला यायला तयार झाली. तिची माझी मैत्री जवळजवळ ३८ वर्षांची... ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम केलं.. भेटत राह्यलो!! तिचा शांत स्वभाव, काम करण्यातलं सातत्य यामुळे गेली कित्येक वर्ष ती दिलासा ह्या डोंबिवलीतल्या वृध्दाश्रमाचं काम पहातेय!! आणि परिक्रमेत मला सांभाळून घेतलं.
महत्वाचं म्हणजे दोस्ती टूरची संपूर्ण टीम ज्यांचा उत्तम व्यवस्थेसाठी इथं खास उल्लेख करायला हवा. त्यांच्यामुळे जेवण-खाणं, सामानाची ने-आण, प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थित रीतीने पार पडत होती. अर्थात ह्या सगळ्याच उत्तम आयोजन दोस्तीच्या प्रवीण ह्यांनी केलेलं होतं.अगदी पुजेसाठी गुरूजी, पुजा करायला घाटावरच्या नीटनेटक्या जागा, दर्शनासाठी नीट व्यवस्था हे सगळं प्रवीणनी त्याच्या समजूतदार स्वभावानी उल्लेखनीय रीतीने आम्हाला सांभाळून घेत केलं.
ललिता छेडा
No comments:
Post a Comment