Monday, January 1, 2024

मला भेटलेली नर्मदा

मला भेटलेली नर्मदा

        खरं म्हणजे माणसं एकमेकांना भेटत असतात पण मला परिक्रमेत अनेकदा नर्मदा भेटली. भेटीची ही ओढ बर्‍याच वर्षांपासून होती. पण गेली ३/४‌वर्ष इतकी वाटावळणाची,खाचखळग्यांची गेली की विचार करायला सुध्दा वेळ नव्हता.
     सहा महिन्यांपूर्वी बावन्न वर्षांचा संसार,चोपन्न वर्षांचा सहवास सोडून सहचर कायमचा दूर गेला आणि एकटेपणात आठवली ती "नर्मदा" ... वाटलं अनिल अवचटांनी सांगितलेलं थांबणं शिकायसाठी, स्वतःसाठी जगण्यासाठी ही परिक्रमा करायला हवी.हा मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा प्रवास होता. एकटीनं प्रवास करणं मनात होतं पण वय आणि आरोग्याचा विचार करून अगदी जवळच्या मैत्रिणीला गीताला विचारलं आणि तिनं लगेच हो म्हटलं!! सुरवात तरी सकारात्मक झाली होती.
       १८ दिवसांच्या ह्या बस टूरमध्ये चार दिवस प्रवास करुन  उज्जैन -‌इंदौर पोहचण्या-येण्याचे होते आणि १४ दिवस परिक्रमा होती.
           परिक्रमेत कथा कहाण्या ऐकताना नर्मदा अगदी जवळून कळत जाते. पूजा सांगणार्‍या गुरूजींकडून, मंदीरं,गुफांचा इतिहास सांगणार्‍या गाईड कडून, अगदी घाटावर घेऊन जाणार्‍या रिक्षावाल्याकडून‌ सुध्दा ह्या कहाण्या ऐकताना नर्मदेचा इतिहास आपल्याला कळतो आणि आपण परिक्रमा का करायची त्याची उत्तरं देखील आपल्याला मिळत जातात.
        भगवान शंकरांच्या तांडव नृत्य करताना शरीरातून जे धर्मबिंदू पडले ती नर्मदा ही पौराणिक कथा आहे.पण मेकल पर्वताच्या अमरकंटकमध्ये एका छोट्या कुंडात तिचे उगमस्थान आहे. ही जेष्ठ बहिण आहे असे मानल्यामुळे ती मातेसमान आहे त्यामुळे तिला नर्मदामैय्या म्हणतात. तर सुरवातीला पूर्वाभिमुख होत अग्नेय दिशेला वाहणाऱ्या नर्मदेचा सोमभद्र राजाशी विवाह ठरलेला असतो पण त्याने केलेल्या प्रतारणेमुळे नर्मदा तो विवाह मोडते आणि  रागाने तोंड फिरवून उलट्या दिशेने वाहू लागते. उलट्या दिशेने वाहणारी ती एकमेव नदी आहे. त्याचमुळे आजन्म कुमारिका म्हणून वाहणाऱ्या नर्मदेला स्त्रीयांच्या सुखदुःखाची किती जाण असेल असा ह्या कथा ऐकताना मनात विचार येत होता. कुमारिका नर्मदेच्या परिक्रमेचा संकल्प केला की किमान ५ कुमारिका पूजन करून परिक्रमेची सुरुवात करायची असते. एका सवाष्णीची ओटी भरायची असते.
       ओंकारेश्वर मंदिरापाशी नर्मदेच्या तीरावर आम्ही संकल्प केला आणि परिक्रमेची सुरुवात केली होती. तिथं सर्वांनी नर्मदा स्नान केलं पण मी मात्र पाण्यात पाय बुडवून तिला अर्ध्य दिलं. त्या दिवशी ओहोटी असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होती. पण शेवटच्या दिवशी संकल्पपूर्तीला मात्र मी आवर्जून नर्मदा स्नान केलं आणि खूप भरती असल्याने खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला.  तो स्फटिकासारखा पारदर्शी प्रवाह  मला नर्मदेची भेट घडवून आणत होता. इथं एक सांगावं वाटतं की प्रत्येक घाटावर आम्ही पहिलं थोडं पाणी त्या प्रवाहात सोडत होतो आणि नवीन तिथलं पाणी भरून घेत होतो पण कधीच गढूळ काळसर पाणी बाटलीत आलं नाही... नेहमी स्वच्छ निर्मळ पाणी भरलं जातं होतं. नदी तिच पण कधी ती नर्मदामैय्या तर कधी अखंड कुमारिका आणि कायम नमामि *देवी* नर्मदे!!

         रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळी पहाट उमलत असताना नर्मदा तीरावर नर्मदेचं पाणी बाटलीत भरून त्याची पूजा करायची... कपाळावर चंदनाचा टिळा लावणार्‍या मंडळींकडून कपाळावर पहाट नटवायची... श्रध्देने नर्मदाष्टक म्हणायचं, नर्मदेची आरती करायची आणि  पुढच्या प्रवासाला निघायचं!!
          आता पूढे जाऊया परिक्रमेच्या प्रवासाला!
।।आज मात्र सर्व वाचक रसिकांना नववर्षाच्या शुभेच्छा।।
                       ।।नर्मदे हर।।
  ‌‌                                 ललिता छेडा 

1 comment:

  1. नर्मदा नदीच्या प्रवाहाची पहिल्यांदा एवढी छान सुटसुटीत माहिती मिळाली. छेडा मॅडम खूप छान लेख लिहिला आहे आता पुढच्या लेखाची उत्सुकता

    ReplyDelete

त्रिवेणी संगम - केदारेश्वर

राजपिपला जाण्यासाठी प्रवास करत असताना ‌महाराष्ट्रतल्या नंदूरबार जिल्ह्यात प्रकाशा हे गाव लागतं.ह्याला प्रति काशी असंही म्हटलं जा...