Thursday, February 1, 2024

परिक्रमेतला रोजचा दिवस!!

       उज्जैनला उतरून स्लीपिंग कोचच्या बसमध्ये‌ पहिल्यांदा चढल्यावर दिसली मध्ये एक छोटीशी वाट आणि दोन्ही बाजूला चारजणांना बसायला दोन/दोनच्या सीट!! आम्ही तिघीजणी होतोच चौथ्या आमच्या बरोबर होत्या शुभांगी देसाई!! आणि शेजारच्या सीटवर होते डहाळे आणि दळवी दांपत्य!! 
डहाळ्यांची लीना म्हणजे चैतन्य होतं! गप्पा,गाणी त्याचबरोबर पौराणिक कथा सांगण्यातही हूशार असलेली लीना आनंदी जगण्याचं उत्तम उदाहरण आहे तिचं रोज संध्याकाळी परदेशात असणाऱ्या नातवंडांबरोबर बोलणं म्हणजे आनंदाचा ठेवा असायचा..तर आनंदात कसं जगावं हे आपल्या धार्मिक वृत्तीने, आध्यात्मिक अभ्यासाने सांगणारे,वागणारे इंद्रजीत डहाळे..अशी ही *मेड फाॅर इच अदर* असलेली जोडी!! नंतर बोलता बोलता त्या दोघांच्या नात्यातली उमा दिक्षित माझ्या पण जवळची मैत्रीण असल्याचं कळलं... वाटलं जग किती छोटं आहे आणि त्यामुळे ते दोघे माझ्या खूप जवळचे होऊन गेले.
         दुसरं दांपत्य म्हणजे वर्षा आणि अनिल दळवी.. वर्षाताई शांत आपल्या जपाच्या आनंदात मग्न तरीही आमच्या गप्पा,गाण्यात भाग घेणाऱ्या आणि अनिलनी तर मदतीचा हात सतत पूढेच ठेवला होता. अशी ही चौघंजण आणि आम्ही तिघी ह्या काळात एक कुटुंब झालो होतो. तिघी म्हटलं कारण आमच्यातल्या आजी आजारी पडल्यामुळे घरी परतल्या होत्या. त्यांचं असणं - नसणं माझ्यासाठी एक अनुभव होता जो नंतर केव्हातरी!!
       दिनक्रम सांगताना ह्या चौघांच असणं आवश्यक होतं म्हणून हा उल्लेख केला. 
       सकाळी बहुतेक पावणे पाच वाजता बेड-टी‌ दरवाज्यात यायचा! आम्हा बायकांसाठी बेड-टी हे एक स्वप्न असतं पण इथं ते लवकर उठून जागेपणी बघावं  लागायचं!! त्यानंतर बॅग पॅक करून बाहेर ठेवायच्या.आणि सुर्योदयाला जिथं उतरलो असू तिथल्या घाटावर जायचं!! आमच्यातल्या बाळदादांनी अगदी प्रत्येक घाटावर आंघोळ केलेय... आम्ही मात्र तिथं आपल्या जवळच्या बाटलीतील थोडीशी नर्मदा तिथल्या नदीत प्रवाहित करायची आणि तिथली भरून घ्यायची,पुजेची तयारी करायची अशा गडबडीत असायचो. अनेकदा  तिथं पाण्यात दिवे सोडायचे. बहुतेक ठिकाणी पुजा सांगायला गुरूजी असायचे. नर्मदाष्टक आणि नर्मदा आरती झाली की पुन्हा परतायचं. नास्ता तयार असायचाच ज्याचा आनंद घेऊन पूढच्या प्रवासाला निघायचं! दुपारचं जेवण अनेकदा एखाद्या मंदीरात किंवा वनभोजन असायचं. संपूर्ण परिक्रमा ३५०० कि.मी.ची असल्याने रोज खूप प्रवास करावा लागायचा.जेवण झाल्यावर सर्वांच्या सीटचे बेड व्हायचे.आणि चहाची वेळ होईपर्यंत आराम करायला मस्त वेळ मिळायचा.... बसनी केलेल्या परिक्रमेचा फायदा!!
         संध्याकाळ मात्र संगीतमय असायची. ह्यात एक गंमत होती... बसमध्ये बसायला रोटेशन होते आणि पहिली सीट मिळाली की हातात माईक!! आमच्याकडे तीन गायिका होत्या माझी‌ मैत्रीण, माझी परिक्रमेची सहचर गीता, लीना आणि शुभांगी!! वर्षाताई अडल तर गायला होत्याच.१४ दिवसात दोनदा माईक मिळाला. आणि एकदा अन्ताक्षरी  झाली.
    आमच्या गृपमध्ये गायक‌ होते गणेश शिंदे!! ते गाण्याच्या पूर्ण तयारीने आले होते आणि गायचे पण उत्तम!! भजनं, भावगीतं मराठीच नाही तर हिंदीत सुध्दा असायची. त्यामुळे संध्याकाळ गणेशजींची असायची. त्यांना साथ असायची प्रवीण तावडे(बाळ दादा). तीन बहिणींचा लाडका भाऊ प्रवीण म्हणजे गृपमधला उत्साह आणि कोणत्याही बाबतीत चुक झाली की पूढे असणारे त्यासाठी आवाज उठवणारे आमच्या डोंबिवलीचे प्रवीण दादा!!
       संध्याकाळी सर्वात पहिली रामरक्षा नंतर हनुमान चालीसा, भीमरूपी तसेच इतर‌ स्त्रोतांचे पठण शेवटी नर्मदाष्टक आणि नर्मदा आरती!! त्यानंतर व्हायचं आमचं सगळ्यांचं फेवरेट
  भक्तोंके मनको लुभाई गई रे
  एक कन्या कुंवारी।। सुरू व्हायचं. नंतर बसमधून उतरेपर्यंत ही मैफल रंगायची.
      शेवटचे चार दिवस आम्ही जिथे उतरलो तिथल्या हाॅलमध्ये आरती केली आणि नंतर गरबा, फुगड्या खेळलो तोपर्यंत सर्वजण एकमेकांचे छान मित्र -मैत्रिणी झालो होतो त्यामुळे संगीताच्या माध्यमातून जवळचे होऊन गेलो.
   ‌  संध्याकाळी लवकर पोचलो‌ तर हे सगळं एखाद्या घाटावर जाऊन पूजा व्हायची. पाण्यात दिवे सोडायचे  आणि आरती व्हायची. पाण्यातले दिवे डोळ्यांना लुभवायचे!! दिवस संपायचा आणि आठवणीत जायचा.
     ललिता छेडा 

      

1 comment:

  1. खूपच छान अनुभव....नर्मदा परिक्रमेचे आध्यात्मिक सुखही आणि अगदी उशीजवळ आलेल्या बेडटीचे सुखही. व्वा...खूप छान. शिवाय ती रोटेशन पद्धतीची बसण्याची व्यवस्थाही चांगलीच. एकुण तुमची नर्मदा परिक्रमा वाचत असतांना आम्हालाही त्याचा लाभ झाला आहे. आणि नर्मदेला बघण्याची ओढ अधिक वाढली आहे....

    ReplyDelete

त्रिवेणी संगम - केदारेश्वर

राजपिपला जाण्यासाठी प्रवास करत असताना ‌महाराष्ट्रतल्या नंदूरबार जिल्ह्यात प्रकाशा हे गाव लागतं.ह्याला प्रति काशी असंही म्हटलं जा...