खडकां वरून लहान लहान धबधब्याच्या रूपात शेजारी चालत असणार्यांना तुषारांनी भिजवतो. दुर्वास ऋषींच्या गुफेत आध्यात्मिक शांतता देतो. वानरसेनेची सोबत आपल्याला सतत जागृत ठेवते.
बसमधून प्रवास करताना दुपारच्या वेळी बाहेर बघितलं की शेती आणि ग्रामीण भागातील दुकानं,घरं दिसायची. एखाद्या चित्रा सारखी ती दृश्ये असायची. परिक्रमा करताना आपण मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून प्रवास करतो.प्रत्येक राज्य आपला स्वतःचा निसर्ग,प्रवाह आपल्याला वेगळेपण दाखवत रहातो.
नर्मदेचे घाट स्वतःचं सौंदर्य घेऊन आपल्याला भेटतात. प्रत्येक घाटावर उतरताना आणि चढताना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती देतात.त्यातसुध्दा लक्षात रहातात महेश्वरचा आणि हौशिंगाबादचा शेठाणी घाट!! अनेक मंदिरांसमोरची झाडं,वेली, वृक्ष निसर्गाचं सुंदर रूप दाखवत होती. दोन/ तीन ठिकाणी वड,पिंपळ, कडूनिंब अशी तीन झाडं एका खोडाशी एकत्र झालेली दिसत होती जे बघायला खूप वैविध्यपूर्ण दिसत होतं.
घाटांवर उतरताना बांगड्या,स्फटिकांच्या वस्तू, पिशव्या, नर्मदेतले गोटे ह्यांची दुकानं आपल्याला थबकवतातच!!
स्थापत्यामध्ये मध्य प्रदेश एक नंबरवर ठरतो. मांडू किंवा मांडवगड येथील राणी रुपमतीचा महाल म्हणजे ह्या कलेचं उत्तम उदाहरण आहे. बाजबहाद्दूरानी आपल्या लाडक्या राणीसाठी बांधलेला हा महाल तिच्या एका अटीवर बांधला आहे. ती अट म्हणजे नर्मदेच्या दर्शनाशिवाय ती जेवणार नाही. आणि ती अट बाजबहाद्दूरानी इतक्या उंचीवर रेवाकुंड बांधून पूर्ण केली आहे. तिथला जहाज महाल, तबेली महाल अशा अनेक वास्तू आपल्याला पहायला मिळतात.महालात उंचावर गेल्यावर अप्रतिम निसर्गसौंदर्य न्याहाळता येते .तिथं महालात गृपच्या सर्वांनीच खूप फोटो काढले. राणी रुपमतीचा महाल आमच्या साठी फोटोंमुळे आठवणींची अत्तरकुपी झाली.
तसाच सुंदर भेडाघाट!! भेडा म्हणजे संगम... नर्मदा आणि बावनगंगा ह्या दोघींच्या संगमामुळे हे नांव पडले असावे. नर्मदा नदी उंचीवरून अनेक ठिकाणी खाली कोसळते आणि त्याचे तुषार नौकानयनाच्या वेळी अंगावर शहारे आणतात. आमचा नावाडी तर शीघ्र कवी होता त्यामुळे नौका प्रवासाबरोबर शायरी पण ऐकायला मिळत होती.
अशा प्रत्येक ठिकाणी नेमकी असणारी, हमखास थांबणारी आमच्या गृपचं चैतन्य म्हणजे मनीषा... प्रत्येक घाटावरची खरेदी म्हणजे मनीषा... गृपमधल्या प्रत्येकाची काळजी घेणारी म्हणजे मनीषा... कोणत्याही परिस्थितीत सर्वांना समजून घेणारी म्हणजे मनीषा...अशी मनीषा अवघ्या १८ दिवसात माझी जवळची मैत्रीण झाली. तिच्या आळेफाट्याला तिनं आवर्जून बोलावलंय आणि मी जाणार आहे. परिक्रमेतला एक निसर्ग, स्थापत्याशिवाय जुळलेला बरंच काही देणारा एक ऋणानुबंध मनीषा..
।उद्याच्या नर्मदा जयन्तीच्या तुम्हां सर्वांना शुभेच्छा।
ललिता छेडा
No comments:
Post a Comment