Thursday, February 29, 2024

अहिल्याबाई होळकर

        नर्मदा परिक्रमेविषयी लिहिताना मार्च महिन्यात येणार्‍या महिला दिनानिमित्त लिहावं असं वाटलं!! आणि परिक्रमेत भेटलेल्या ज्या दोन महिलांविषयी लिहायचं ठरवलं त्या  म्हणजे अहिल्याबाई होळकर आणि नर्मदायनाच्या भारती ठाकूर!! 
    अहिल्याबाईंनी आपण शिकलेल्या इतिहासात तिच्या स्वभावातल्या उदार वृत्तीने अनेक नद्यांच्या घाटांवर आपल्या प्रतिभेचे सुर्यकिरण उमटवले. धर्मशाळा बांधल्या,अन्नछत्र सुरू केली. तर भारतीताईंनी‌ आपल्या कर्तृत्वाने‌ नर्मदा परिक्रमेनंतर तिथल्या आदिवासींची गरज ओळखून शिक्षणाची अनेक दालनं त्यांच्यासाठी उघडली. 
    अहिल्याबाई होळकर,सत्तर वर्षांचे सफल आयुष्य! दु:खाचे आघात सोसत व्यक्तिगत जीवनात स्वजनांकडून सन्मान घेत तर कधी त्यांच्याशी झगडून मिळवलेलं यश!! राजकारण केलं तरीही कधीच अहिल्याबाईंनी सत्तेसाठी कधीच संघर्ष केला नाही. 
     अहिल्याबाईनी पतींच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांच ऐकून सती न जाण्याचा निर्णय घेतला. मल्हाररावांच व्यवहारातल चातुर्य अहिल्याबाईनी कारभार करताना उत्तमरीत्या शिकून घेतलं. अहिल्याबाईंच्या दुर्दैवाने मल्हाररावां नंतर त्यांनी आपला एकुलता एक मुलगा पण गमावला. घरातल्या तीन पुरूषांना गमावल्यानंतर वारस हा प्रश्न निकालात निघत नव्हता.याच अस्थिर काळात अहिल्याबाईंनी एक निर्णय घेतला.त्यांना इंदूरला‌ होळकर वाड्यात रहाणं नकोस वाटत होतं.त्यामुळेच अहिल्याबाई महेश्वर निवासिनी झाल्या. नर्मदा किनाऱ्यावरचा महेश्वरचा घाट सुंदर केला गेला. अनेक मंदिरे बांधून भजनकीर्तनाचे टाळमृदंगाचे आवाज महेश्वर मध्ये घुमु लागले.
    नर्मदा परिक्रमा करताना महेश्वरला आल्यावर हे सगळं जवळून पाहता येतं. अहिल्याबाईंचा वाडा अजूनही तितकाच उत्तम स्थापत्याचा नमुना आहे. ज्या जागेवर बसून त्या न्याय देत असत ते बघताना न कळत हात जोडले जातात. महेश्वर मध्ये स्त्रीयांना हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली.आजही महेश्वरी साड्या प्रसिद्ध आहेत.
     वारस प्रकरणात राघोबांना जेरीस आणून अहिल्याबाई जिंकल्या. ह्याबाबत अनेक आख्यायिका आहेत.त्यातील एक म्हणजे अहिल्या स्रियांच सैन्य घेऊन राघोबासमोर उभ्या राहिली. पण एक गोष्ट नक्की की त्या पेशव्यांशी निष्ठावंत होत्या पण त्या कधीच झुकल्या नाहीत. 
       पुण्यश्लोक अहिल्याबाई ज्यांच्या हातातली शंकराची पिंड त्यांची ईश्वरभक्ती दाखवते.तरीसुध्दा सर्वधर्मसमभाव, स्त्रीपुरूष समानता,मुल दत्तक वारसा हक्क अशा अनेक विषयांचा अभ्यास करून हे सर्व प्रजेमध्ये रूजवल.लोककल्याणकारी कार्य करत असताना संपूर्ण भारतात विहीरी,तलाव,घाट बांधले.   
       परंपरेची चौकट मोडून मुलभूत विचार करण्याची क्षमता असलेल्या अहिल्याबाईंना २०/२५ ओळींमध्ये महिला दिनानिमित्त प्रणाम करणं खरं म्हणजे खूप कमी वाटतंय पण नर्मदा परिक्रमा केल्यामुळे‌ नर्मदा नदीच्या काठावर,घाटांवर अहिल्याबाई अनेकदा भेटल्या आणि त्यांचा अभ्यास करावा असं वाटलं आणि म्हणूनच हा लेखनप्रपंच!!
सर्व रसिक वाचकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌿
  ‌.                       ललिता छेडा 
       

No comments:

Post a Comment

त्रिवेणी संगम - केदारेश्वर

राजपिपला जाण्यासाठी प्रवास करत असताना ‌महाराष्ट्रतल्या नंदूरबार जिल्ह्यात प्रकाशा हे गाव लागतं.ह्याला प्रति काशी असंही म्हटलं जा...