Thursday, March 14, 2024

नर्मदालय

      परिक्रमा करायचं ठरल्यावर त्यावरची अनेक पुस्तकं वाचून काढली, युट्यूबवर चे व्हिडिओ बघितले. पण " नर्मदा परिक्रमा... एक अंतर्यात्रा" हे भारती ठाकूरांच पुस्तक म्हणजे लेखिकेने तिच्या अंतर्मनाशी केलेला संवाद आहे.जो 'सखी'च्या माध्यमातून भारतीताई आपल्याशी करतात. पुस्तक खूप आवडलं आणि मनात आलं आपल्याला ह्यांना भेटायला मिळेल का? कारण आमच्या परिक्रमेच्या कार्यक्रमात त्यांच्या नर्मदालययाला भेट होती. पण त्या सतत कामानिमित्ताने फिरतीवर असल्यामुळे भेट होईलच अशी खात्री नव्हती.
      आम्ही ओंकारेश्वरला परिक्रमेचा संकल्प केला आणि वडवाणीला जाताना लेपा पुनर्वास बालक आश्रमला भेट द्यायला गेलो. नर्मदालयाच्या दाराशीच भारतीताई दिसल्या आणि मला जो काही आनंद झाला की मी अगदी सरळ जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यानंतरचे दोन अडीच तास भारती ठाकूरांच कार्य कर्तृत्व जाणून घेण्यातच गेले.
    त्यांनी आमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत केलं आणि त्यांच्या कामाबद्दल सांगितलं आणि सगळ्या कामाच्या जागांची फिल्म दाखवली.त्याना परिक्रमा करताना मुलांशी बोलताना कळलं की " ती मुलं ५/६ वी त आहेत पण त्यांना लिहीता -वाचता येतच नाही. मुलं बालमजूरीत अडकून पडली होती. शेतात काम करणं त्यांची गरज होती शिक्षकांचे प्रश्न तर खूप होते. त्या परिक्रमेतून परतल्यावर घरच्यांची परवानगी घेऊन नोकरी सोडून एक सुटकेस घेवून मंडलेश्वरला आल्या. तिथं भाड्याच्या घरात त्या राहू लागल्या. तिथून लेपा गावातल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली.... त्या रहात होत्या तिथून लेपा ८ किलोमीटर अंतरावर होतं. रोज येणं जाणं किती कठिण होतं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.त्याशिवाय येणाऱ्या अडचणी तर मी इथं लिहू शकत नाही कारण त्याचा एक वेगळा लेख होईल. 
    सुरवातीला १४  मुलं येत होती.दोन महिन्यात १३२ मुलं यायला लागली.त्याच गावातल्या दोन मुली त्यांना मदत करू लागल्या.त्यांनी इतिहास पुस्तकांपेक्षा गोष्टीतून शिकवायला सुरुवात केली. मुलांना अहिल्याबाई सुध्दा माहित नव्हत्या. पर्यावरण, गणित हे विषय मुलांना खेळातून शिकवले. हे सगळं माझ्या लिहीण्यात आणि तुमच्या वाचण्यात सोप्पं वाटतय पण भारतीताईंनी घेतलेली मेहनत कल्पनेच्या पलीकडे आहे. पण ती मेहनत परमेश्र्वराकडे पोचली आणि एका नागासाधूंनी सध्या जिथे नर्मदालय आहे ती जागा भारतीताईंना दान दिली‌ आणि भारतीताईंना शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी आकाश मोकळं झालं.. आज अनेक गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.त्यांनी तिथल्या महिलांना शिवणकाम शिकवून व्यावसायिकरित्या तयार केलं आहे.‌नर्मदालयात अद्ययावत  डिझाईनचे गाऊन, कुडते, शाॅर्ट टाॅप विक्रीसाठी उपलब्ध होते. जे अतिशय उत्तम दर्जाचे होते.
       गिर्यारोहण, पदभ्रमणाची आवड, नाशिक ते दिल्ली सायकलने सफर, कैलास मानसरोवर यात्रा, विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित विवेकानंद केंद्राचे काम करणाऱ्या भारती ठाकूर... ह्यांच अस्तित्व मला महिला दिनाच्या एका दिवसापूरत मर्यादित अजिबात करायचं नाही. ते कार्य एका पिढीला घडवते आहे आणि पुढच्या सर्व पिढ्यांसाठी  उत्तमप्रकारे घडत रहाणार आहे.त्यांनी जे  केलं आहे ते बघणं आणि त्यांना भेटणं,त्यांना ऐकणं
 नर्मदा परिक्रमेतला एक अभिमानास्पद क्षण होता.        भारती ठाकूर यांच्या कार्याला,विचारांना मनापासून सलाम!!
        आमच्या नर्मदा परिक्रमा गृप बरोबर भारतीताई              
                  ललिता छेडा 

No comments:

Post a Comment

त्रिवेणी संगम - केदारेश्वर

राजपिपला जाण्यासाठी प्रवास करत असताना ‌महाराष्ट्रतल्या नंदूरबार जिल्ह्यात प्रकाशा हे गाव लागतं.ह्याला प्रति काशी असंही म्हटलं जा...