१) महाकालेश्र्वर मंदिर 
आम्ही उज्जैनला उतरल्यावर संध्याकाळी महाकालेश्र्वरांच दर्शन घ्यायला गेलो.क्षिप्रा नदीचं दर्शन ह्यामंदीरात जातानाच घडतं!!
ओंकारेश्वर मंदिर
भगवान शंकरांनी तिथं त्रिपुरासूरचा वध केला म्हणून ती उज्जयिनी नगरी अशी कथा स्कंदपुराणात आहे.इथ सतीचा एक कोपर गळून पडला म्हणून ते शक्तिपीठही मानलं जातं. जैन आणि बौद्ध धर्माची पवित्र स्थानंही इथं आहेत.
महाकालेश्र्वरांच्या निर्मितीची कथा शिवपूराणात सांगितली आहे.शंकर भक्तांच्या कडक तपश्चर्येनंतर भूमी दूभंगून शंकर प्रगट झाले आणि तिथल्या लोकांना त्रास देणाऱ्या दूषण ह्या राक्षसाचा वध केला. हे ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे असं सांगितलं जातं!!
आम्हांला दर्शनासाठी २५०/₹ दिले तर व्ही.आय.पी.दर्शन होईल असं सांगितलं गेलं पण एकंदर खूप गर्दी नसल्याने आम्ही साधं लाईन लावूनच दर्शन घेतलं पण खूप दूरून दर्शन झालं मनाला समाधान नाही वाटलं आणि २५०/₹ वाली मंडळी खूप जवळून दर्शन घेत होती. उगीचच एक खंत मनात राहून गेली. मी स्वतः २०/२५ वर्षांपूर्वी अगदी गाभाऱ्यात जाऊन पूजा केली होती ते आठवलं. मंदिराच्या आवारात गणेश, पार्वती व कार्तिकेय ह्यांच्या मूर्तींचे मंदिर आहे.
उज्जैन मध्ये तशी अनेक मंदिरे आहेत पण इथं कालभैरवाचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो.या देवाला दारूचा प्रसाद चढवला जातो.मूर्तिही दारू पिते..त्याबद्दल संशोधन झाले आहे पण पाजलेली दारू कुठे जाते त्याचा मात्र पत्ता लागत नाही. तिथेही खूप गर्दी होती.
बाहेर पडल्यावर मात्र संपूर्ण कॅरिडाॅर विविध शिल्पे, कारंजे आणि सुंदर लायटिंगनी सजलेला आहे. जे बघताना, फोटो काढताना दोन तास कुठे गेले ते कळलंच नाही.
२) ओंकारेश्वर... ममलेश्वर
ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या पात्रातील एक बेट आहे. या बेटाचा आकार ॐ प्रमाणे आहे.म्हणून ह्या महादेवाला ओंकारेश्वर म्हणतात. तिथेच ममलेश्वराचे मंदिर आहे ह्या दोघांना मिळून एक ज्योतिर्लिंग म्हटले जाते.
आम्ही नर्मदेत पवित्र स्नान करून परिक्रमेची संकल्प पूजा केली नंतर होडीतून ओंकारेश्वरांच्या दर्शनाला गेलो. तिथं बाटलीत नर्मदा भरून घेतली होतीच. पूढच्या प्रवासात रोज सकाळी त्या नर्मदेचं पूजन केलं.
परिक्रमा पूर्ण झाल्यावर पूजन केलेली नर्मदा ओंकारेश्वरांना वाहून समाप्ती होते असं मानलं जातं. आमची परिक्रमा ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी होती.
अशी ही दोन महत्त्वाची ज्योतिर्लिंग ज्यांचा परिक्रमा करताना श्रध्देने उल्लेख करावा लागतो.
पुढचे ब्लॉग जवळजवळ २/३ महिने महत्वाची मंदिरं आणि तिथला निसर्ग असेच असतील.
फक्त एक वेगळेपण असावे आणि १८ दिवसात ओळख झालेल्यांचा अधिक परिचय व्हावा यासाठी थोडा वेगळा प्रयत्न करणार आहे. दर ब्लॉग मध्ये आपल्या बरोबर असलेल्यांचा थोडक्यात परिचय देणार आहे.
पहिल्या आहेत रसिका जाधव आणि किरण बरोडिया ह्या दोघी मैत्रिणींचा परिचय!!
दोघीही दहिसरला रहातात.
किरणनी चर्चगेटला Adelphi Minister of Defence इथं ३७ वर्ष नोकरी केली आणि २०१७ ला VRS घेतली.गेली ३० वर्ष ती एकटीच मजेत रहातेय.प्रवास करणं तिची आवड आहे.तिच कौतुकास्पद वाक्य म्हणजे " मी माझ्या बरोबर माझ्याकडे काम करणाऱ्यांना इच्छा असेल तर प्रवासाला घेऊन जाते" मला जाणवलेली मनमोकळी किरण परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून आहे.
दुसरी म्हणजे रसिका जाधव जी माझ्या सारखीच पायांच्या प्राॅब्लेम मुळे खाली बसू शकत नव्हती त्यामुळे आमची जोडी पूजा करताना उंचावर जागा शोधून जवळ बसलेली असायची. रसिकांनी ३० वर्ष LIC Administration मध्ये नोकरी केली आणि २०१७ ला officer's post वरून VRS घेतली. आवडीमुळे तिनं भारत आणि भारताबाहेर भरपूर प्रवास केला आहे.
तिचं खास वाक्य म्हणजे "मी धार्मिक आहे सत्यनारायण,रूद्र, तुलसी विवाह अशा अनेक पूजा मी स्वतः मांडते आणि करते देखील!!
काय.. छान ओळख झाली ना किरण आणि रसिकांची...अशाच जमतील तशा ओळखी करून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे.
अर्थात सर्वांचं सहकार्य महत्वाचं!!
- ललिता छेडा
No comments:
Post a Comment